Chandika Devi Dabhol – चंडिका देवी मंदिर , दाभोळ

चंडीका देवी मंदिर, दाभोळ

श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर

 

चंडिका देवी मंदिर मनमोहक आणि सुंदर समुद्र किनारे, किनाऱ्यावर हिवाळ्यात येणारे ‘सी गल’ पक्षी, याच दरम्यान मधूनच कधीतरी घडणारे डॉल्फीनचे दर्शन, हर्णे बंदरावरचा मासळी बाजार, सुवर्णदुर्ग, मंडणगड,  बाणकोट यांसारखे गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्हातील दापोली तालुक्यात वसलेले दाभोळ हे गाव “दालभ्य” ऋषींच्या वसतीस्थानाने पावित्र्य झालेले असून एक निसर्गरम्य आणि हिरवेगार गाव अशी ओळख आहे.

दाभोळ बंदराजवळ वाशिस्ठी नदीच्या तीरावर चंडिका देवीचे स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे. दापोली-दाभोळ रस्त्यावर दाभोळच्या अलीकडल्या डाव्या बाजूच्या पठारावर तीन किलोमीटर अंतरावर चंडिका देवीचे मंदिर आहे. एकसंध कातळात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये चंडिका देवीची सुमारे साडेतीन फूट उंचीची काळ्या पाषाणातली शेंदूर लावलेली मूर्ती आहे. अशा या श्री स्वयंभू चंडिका देवीचे रुप जेव्हढे सुंदर तेव्हढेच रौद्रही भासते. देवीच्या भुवया या मोठ्या असून ती आपल्या नयनांनी संपूर्ण दाभोळवर देवीच्या नजरेची सावली असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. चंडिका देवीचे मुख नैऋत्य दिशेला असून देवीला चार हात आहेत. उजव्या हातात तलवार, डाव्या हातात ढाल तसेच इतर आयुधे आहेत.

 

श्री स्वयंभू चंडिका देवी
श्री स्वयंभू चंडिका देवी

 

देवीच्या मूर्तीजवळ एक इतिहासकालीन तलवार आहे.  गुहेचे तोंड चांदीच्या पत्र्याने मढवलेले असून, लहान असल्याने आत वाकून जावे लागते. गुहेत अंधार असून ठिकठिकाणी दिवे लावलेले आहेत तसेच कृत्रिम दिवे किवा टाॕर्च घेऊन जाण्यास मनाई आहे. नवरात्रीत मंदिराच्या मुख्य द्वाराजवळच घटस्थापना केली जाते. पहाटे साडेचार-पाचच्या सुमारास काकड आरती होते आणि दसर्‍याच्या दिवशी सोने लुटून मंदिरावर निशाण चढविले जाते. देवीचे रूप हे स्वयंभू असून ती नवसाला पावते अशी ओळख आहे. उत्सवाच्या काळात आजूबाजूच्या गावातून भक्त देवीच्या दर्शनाला हजारोंच्या संख्येने येत असतात.

चंडीका देवी मंदिर

शिवाजी महाराजांनी दाभोळ जिंकल्यानंतर अंजनवेलचा गोपाळगड, गोवळकोट व आडीवरे भागावर स्वारी केली होती. तेव्हा मोहिमेदरम्यान अनेक वेळा त्यांनी या स्थानास भेट दिली होती, असा इतिहासात उल्लेख आलेला आहे. दाभोळ गावात असलेल्या ईंगळाइ-भैरीदेवी या श्री चंडीकेच्या बहिणी असून दालभ्येश्वर, नवनाथ दत्त मंदिर आदी देवांना तीने आपल्या छत्रछायेखाली घेतले असल्याचे येथील  स्थानिक सांगतात.  फार पूर्वी दालभ्य ऋषींनी इथल्या गुहेत तप-साधना केल्याचे सांगितले जाते.

खास कोकणी निसर्ग सौंदर्याबरोबर स्वयंभू दालभ्येश्वर मंदिर, नवसाला पावणारा सय्यद अमीरूद्दीन बालापीर, अंडा मशिद आपले वैशिष्ट्ये जपून आहेत. अंडा मशिद हा प्राचीन वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे.
चिपळूणकडून येणारी वशिष्टी नदी, पलीकडील डोंगरावरचा गोपाळ गड, टाळकेश्वराच्या देवळाचे शिखर, दाभोळकडील बाजूचे मशिदीचे मिनार, शिळावरचे मारुती मंदिर, समुद्रकिना-याला लागूनच वाढलेले सुरुचे दाट वन आणि खाडीच्या किनारपट्टीत वाढलेले उंच माड आपल्या हिरव्यागार झावळय़ांचा गुच्छा करून वा-याच्या झुळकीने येणा-यांचे स्वागत करत असतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी तर ही निसर्गाची शोभा बघण्यासारखीच असते.

– विशाल चं. अडखळे.
मावळे ट्रेकर्स


About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top