Talagad – तळागड


Talagad - Tala, Raigad

Table of Contents

पायथ्याचे गाव :- तळा, ता. तळा, जि. रायगड.
उंची :- १००० फूट
प्रकार :- डोंगरी किल्ला
श्रेणी :- सोपी, कुटुंबाकरीता सोयिस्कर
लागणारा वेळ :- तळा पुसाटी वाडीतून 20-30 मिनिटे

रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्याचे १९९९ मध्ये विभाजन होऊन तळा तालुका निर्माण झाला. तळा तालुक्यात प्रवेश करताच उंच कड्यासारखा डोंगर लक्ष वेधून घेतो. तळा गावाच्या पश्चिमेस देवाच्या डोंगराच्या पुर्वेकडील तुटक शिखरावर तळागड किल्ला आहे.

❖ शिवपुर्वकालीन इतिहास :

सातवाहन काळात कोकणातल्या मंदगोर बंदरातून (म्हणजेच आजचे मांदाड गाव) घाटावर व्यापार चालत असे. बंदरात उतरलेला माल घाटावर नेण्यासाठी कुडा-भाजे-बोरघाट-पैठण हा व्यापारी मार्ग अस्तित्वात होता. या घाटवाटांच्या रक्षणासाठी तळागड आणि घोसाळा किल्ला जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहनांनी बांधला असावा. नंतर पुढे हे किल्ले आदीलशहाच्या ताब्यात गेल्यावर सोडवलेकर व कोडवलेकर सरदारांची तळा आणि घोसाळा किल्ल्यावर गडकरी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

❖ शिवकालीन इतिहास :

शिवाजी महाराजांनी इ.स. १६४८ मध्ये तळागड आदीलशहाकडून जिंकून घेतला. अफझल खानाच्या वधानंतर आऊसाहेबांनी अज्ञानदास शाहिराला अफझल वधाच्या पराक्रमावर पोवाडा गायला सुपारी धाडली होती. त्या पोवाड्यात “तळागड-घोसाळगडाचा” उल्लेख येतो तो असा :
“गड मी राजाचे गाईन | कोहोज माहुली भर्जन |
पारगड कर्नाळा | प्रबळगड आहे संगिन |
मस्त ‘तळा’ आणि ‘घोसाळा’ | रोहरी आनसवाडी दोन |
कोरला, कासागड मंडन | दर्यात दिसताती दोन |…..”

पुढे इ.स. १६५९ मध्ये पन्हाळगडावर महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यात गुंतले असताना जंजिरेकर सिद्धीने तळागड आणि घोसाळगडास वेढा घातला, पण महाराजांच्या सुटकेची बातमी कळताच सिद्धी वेढा उठवून जंजिरेस पळून गेला.

तळागडाच भौगोलिक दृष्टीने महत्त्व फार होते. स्वराज्याची राजधानी रायगड आणि जंजिरेकर सिद्धी यांच्या बरोबर मधोमध असलेला हा किल्ला शत्रूला राजधानीपासून दूरवर रोखून ठेवण्यासाठी फार महत्त्वाचा होता. त्यामुळे तळागड आणि घोसळगडास रायगडचा समुद्रातील पहारेकरीच म्हणता येईल. सन १६६५ च्या पुरंदरच्या तहात महाराजांनी जे १२ किल्ले आपल्या सोबत ठेवले होते त्यात तळागड होता, त्यावरून किल्ल्याचे महत्त्व लक्षात येते. पुढे जंजिरेकर सिद्धीवर करण्यात आलेली स्वारी याच मार्गाने झाली असावी.

❖ शिव-उत्तरार्धकालीन इतिहास :

:शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला जंजिरेकर सिद्धीच्या ताब्यात गेला. नंतर इ.स. १७३५ मध्ये पहील्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्याच वर्षीच्या सिद्दी-मराठे तहानुसार या गडाची मालकी मराठ्यांकडे राहिली. पुढे मराठा इंग्रज युद्धात १७ एप्रिल १८१८ मध्ये इंग्रज अधिकारी कर्नल प्राॅथरने गडाचा पाडाव करून गड ताब्यात घेतला.

❖ पाहण्याची ठिकाणे :

किल्ल्यावर जाताना तळा गावातील महालकऱ्यांच्या पडक्या कचेरीच्या आसपास १६ तोफा जमिनीत गाडून ठेवलेल्या आहेत. किल्ला पुर्व-पच्छिम दिशेला पसरलेला आहे. किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्यावर जाताना सैन्यांचे घोडे, बैल ज्या ठिकाणी किल्ल्याच्या पायथ्याशी ठेवत, त्या जागेस त्याकाळी “पुसाठी” म्हणत आणि पुढे त्यावरूनच “पुसाठे वाडी” अस्तित्वात आली असावी.

 छ. शिवाजी महाराज मंदिर-

किल्ल्याच्या पायथ्याशी पुसाटीवाडीत शिवरायांचे मंदीर अलिकडच्या काळात बांधण्यात आलेले आहे.

हनुमान दरवाज-

किल्ल्यात प्रवेश करताना कड्याच्या खाली उत्तर बाजूस पडझड झालेल्या अवस्थेत पहिला दरवाजा लागतो तो हनुमान दरवाजा. त्यासमोरच कातळावर कोरलेली हनुमानाचे शिल्प कोरलेले आहे, यावरूनच हनुमान दरवाजा असे नाव दिले गेले असावे. जवळच कातळकड्यात पाण्याचे टाके आहे. पूर्वेकडे कड्याच्या खाली तटबंदी आहे.

टेहळणी बुरूज आणि तोफ-

हनुमान दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर टेहळणी बुरूज आहे. बुरूजावर तीन तोफा आहेत. पुढे गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो. तसेच पायऱ्यांनी चालत पुढे राहिल्यावर डाव्या बाजूला बुरूज आहे. बुरूजावर शत्रूवर मारा करता यावे म्हणून जंग्या आहेत.

बालेकिल्ला-

बुरूजावरून पुढे गेल्यावर समोरच पडक्या अवस्थेत दरवाजा आहे त्यातून आत प्रवेश केल्यावर आपण बालेकिल्ल्यात पोहचतो. त्यापुढे गेल्यावर दुसरी तटबंदी सुरू होते. उत्तर आणि दक्षिणेस तटबंदी असून पुर्व आणि पश्चिमेच्या टोकाला बुरूज आहेत. बालेकिल्ल्याची पूर्व-पश्चिम लांबी अंदाजे १२०० फूट आहे. पूर्वेकडील रुंदी अंदाजे ९० फूट आहे. बालेकिल्ला पश्चिमेस अरुंद होत गेल्यामुळे तेथे रुंदी फक्त १५ फूट एवढीच आहे. तो मुख्य डोंगरापासून तासून काढल्यामुळे, गडाचे रूपांतर एका अवघड अश्या किल्ल्यात झालेले आहे. बालेकिल्ल्यात जाताना दगडी पायऱ्या आहेत.

दुमजली बुरूज-

बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या दिशेला पडक्या अवस्थेत दुमजली बुरूज असून झेंड्याची ढालकाठी दिसते. ती किल्ल्याची सर्वात उंच जागा आहे. वरच्या भागातील दरवाजाजवळ पूर्व बाजूस बुरूज आणि मशिदीचे अवशेष आहेत. त्यापुढे पश्चिमेस गेल्यावर तीन टाकी दिसतात.

चोरदरवाजा-

बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर पश्चिमेकडील टोकास चालत राहिल्यावर तटबंदीला लागून एक चोरदरवाजा असून सध्या तो बुजलेल्या अवस्थेत आहे. आपत्कालीन प्रसंगी गडावरून दोरीने बाहेर पडण्यासाठीचा हा मार्ग होता.

कचेरी आणि धान्यकोठार-

पश्चिमेकडील बुरुजाच्या दिशेस जाताना सदर, कचेरीचे अवशेष आहेत. जवळच एक धान्यकोठार आहे.

महादेवाचे देऊळ-

बालेकिल्ल्यात दगडी शिवलिंग असलेले महादेवाचे पडके छप्परवजा देऊळ आहे.

पाण्याच्या टाक्या-

किल्ल्यात हनुमान दरवाजाजवळ एक आणि वर बालेकिल्ल्यात 9 अश्या एकूण 10 पाण्याच्या टाक्या असून त्यातील काही टाक्या कोरड्या अवस्थेत आहेत.

पोहोचण्याच्या वाटा :

तळा हे पायथ्याचे गाव आणि तालुकाचं ठिकाण असून ते मुंबई पासून १६० कि.मी. अंतरावर आणि पुण्यापासून १३० कि.मी. अंतरावर आहे.

एसटीने प्रवास-

– तळा या गावात येण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर येथे उतरावे. मुंबई गोवा महामार्गावर असल्याने इंदापूरला येण्यासाठी मुंबई, ठाणे, पनवेल येथून दिवसभर एसटी बसेसची दरवळ असते. तिथून तळा १४ किमी आहे. तिथून तळ्यासाठी एसटी बसेस आणि शेअरींग टमटमची सोय आहे.

– तळा या तालुक्याच्या ठिकाणी थेट येण्यासाठी मुंबईहून एसटी बसेसची सोय आहे ती खालीलप्रमाणे –
– मुंबई-रोवळा (मुंबई सेंट्रल वरून रात्री १०.३० वा.),

– बोरिवली-तळा (सकाळी ५.३० वा.),
– नालासोपारा-तळा (—- )

– रोवळा – तळा – मुंबई ( सकाळी 6.00 वा.)

– तळेगाव- तळा – मुंबई ( दुपारी 2.30 वा.)

– तळा बोरिवली – ( दुपारी 3.30 वा.)

 रेल्वेने प्रवास-

कोकण रेल्वेने येताना रोहा स्टेशन वर उतरून तळ्यासाठी एसटी बसेस आणि प्रायवेट टमटमची सोय आहे किंवा सोयिस्कर अश्या माणगाव स्टेशनवर उतरून एसटी बसने किंवा टमटमने १२ कि.मी. अंतरावरील इंदापूरला यावे आणि तिथून एसटी बसने किंवा टमटमने १४ कि.मी. अंतरावरील तळ्याला यावे.

 व्ययक्तिक वाहनाने-

तळा या गावात येण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर येथून डाव्या बाजूला तळा फाट्याला वळावे. इंदापूर तळा अंतर हे १४ किमी आहे. स्वतःच्या वाहनाने आल्यास तळागड आणि जवळच असणारा घोसाळगड एका दिवसात करता येतो. तसेच अधिक वेळ असल्यास चंडिका देवी मंदिर, कुडा लेणी, गायमुख, वावे धरण, पिटसई गावातील कोंड हे देखील पाहता येतात.

जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था

गडावर जाताना शक्यतो पाणी घेऊनच जावे. तळा हे पायथ्याचे गाव आणि तालुक्याचे ठिकाण असल्याने जेवणाची तसेच राहण्याची व्यवस्था होते. 

   तळा जवळ  पाहाण्यासारखी ठिकाणे:

 
 
Click Here
Click Here
Click Here
Click Here
Previous
Next

– ॲड. विशाल चं. अडखळे.


About The Author

1 thought on “Talagad – तळागड”

  1. खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण माहिती दिली तुमी , माझ्या गाव जवळच हा तळगड आहे ,अशीच माहिती आपल्या गडकिल्याबाबत देत राहा,

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top