Popti party रायगड मधील प्रसिद्ध पोपटी पार्टी आणि चिकन कौल फ्राय


या वर्षी कोकणातील रायगड जिल्ह्यातील तळा, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यात भटकंती करण्याचा आमचा मित्रांचा प्लान ठरलेला होता. त्याप्रमाणे आम्ही तळा तालुक्यातील पिटसई कोंड या माझ्या गावी मुक्कामाला आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आगरदांडा वरून दिघी साठी फेरीबोट पकडली. हेतु एवढाच की समुद्र सफर घडावी. तिथून पुढे दिवेआगार येथिल सुवर्ण गणेश मंदिर, रुपनाणाराण मंदिर पाहून दिवेआगार बीच वर थोडा वेळ विसावलो. त्यानंतर आम्ही श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळ पासूनच नदीकिनारी निसर्गाच्या सानिध्यात दिवस भर Camping करून रात्री शेतावर पोपटी पार्टीचा आनंद घेतला.

आगरदांडा बंदर
सुवर्ण गणेश मंदिर, दिवेआगार
रुपणारायण मंदिर, दिवेआगार
हरीहरेश्वर मंदिर, श्रीवर्धन

कोकणात विशेषता रायगड जिल्ह्यात थंडीच्या दिवसांत शेतावर केली जाणारी “पोपटी पार्टी” खूप प्रसिद्ध आहे. काळोखी थंडी, मातीचा मडका आणि वालाच्या शेंगा यांची अप्रतीम जोड म्हणजे “पोपटी पार्टी”. थंडीची सुरुवात झाली की कोकणात नोव्हेंबर ते मार्च महिन्यात पोपटी पार्टी रंगात येत असते. पूर्वीच्या काळात शेताची राखण करण्यासाठी जमलेले शेतकरी रात्रभर जागरण करताना थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि तोंडाला गोडी म्हणून पोपटी करीत असत. शेतात मिळणारा भाजीपाला आणि रानातल्या भांबुर्डीच्या पाल्यापासून पोपटी करीत असत आणि यासाठी फक्त घरातून आणलेला मीठ मसाला एवढेच साहित्य लागत असे. भांबुर्डीचा पाला थोड्याफार प्रमाणात पोपटी रंगाचा दिसत असल्याने याला “पोपटी” नाव पडले असावे असे वाटते. विशेष करून शिमग्याच्या सणात चाकरमानी गावी गेल्यावर पोपटी पार्टीचा हमखास बेत आखतात.

विदर्भात आणि खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी बाजरीचे कणस भाजून हुरडा पार्टी केली जाते त्याच प्रमाणे कोकणात वालाच्या शेंगाची पोपटी केली जाते. कोकणात अनेक वर्षां पासूनची ही परंपरा असून शेतकरी, गावकरी, चाकरमानी एकत्र येऊन पोपटी करतात तर कधी मित्र मंडळी, पाहुण्यांना पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित केले जाते. पोपटी करीत असताना गुलाबी थंडीत आणि पोपटीच्या शेकोटीत गप्पा गोष्टीचा फड रंगतो तर कधी जुन्या आठवणी, सुख दुःखाची देवाण घेवाण केली जाते.

भांबुर्डीचा पाला :-

पोपटी करण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक म्हणजे भांबुर्डीचा पाला. हा पाला कोकणात हिवाळ्यात उगवतो आणि या वनस्पतीला विशिष्ठ असा सुवास असतो. भांबुर्डीचा पाला म्हणजेच “भामरुड” वनस्पती. हा पाला काही भागात “गोरखमुंडी”, काही भागात “कोंबडा” तर वसई विरार भागात “बोड्योला” नावाने ओळखला जातो. डहाणूच्या काही भागात याला “गड” असेही म्हणतात, तर चिपळूणच्या आसपासच्या भागात याला “मोंगा” असे म्हणतात. पावसाळ्यानंतर माळरानात, शेताच्या बांधावर, ओसाड जागी पायवाटे लगत हा पाला उगवतो. या पाल्यात औषधी गुणधर्म असतात. जखम झाल्यावर या पाल्याचा रस जखमेवर चोळून जखम भरण्यासाठी याचा उपयोग होतो. पोपटीत हा पाला टाकल्या नंतर पाणी नसताना ही या पाल्याच्या वाफेवर मडक्यातील शेंगा आणि ईतर जिन्नस उत्तम प्रकारे शिजतात.

चला तर आता आपण पोपटी कशी करतात याची माहिती घेऊ :-

साहित्य / जिन्नस :– (६ जणासाठी)
मातीचा मडका, भांबुर्डीचा पाला, वालाच्या शेंगा (२ किलो), बटाटे (पाऊण किलो), कांदे (पाऊण किलो), चिकन (१.५ किलो मध्यम आकाराचे), अंडी (१ डझन), ओवा, हळद, मीठ, आले लसूण पेस्ट, चिकन मसाला, गावठी तिखट मसाला, दही, गवताची पेंड, सुकी लाकडे, गोणपाट (गरम मडका उचलण्यासाठी), कोयता (गरम मडका उचलण्यासाठी).

पाक कृती :-
पोपटी करण्या अगोदर किमान २ तासभर चिकनला हळद, मीठ, आले लसूण पेस्ट, चिकन मसाला, गावठी तिखट मसाला, दही लावून मेरिनेट करायला ठेवायचे. नंतर मडक्याच्या तळाशी भांबुर्डीचा पाला पसरून ठेवायचा. त्यावर वालाच्या शेंगा ठेवायच्या. त्यावर कांदे, बटाटे वरच्या वर चिरून त्यात मसाला भरल्यानंतर मडक्यात ठेवायचे. त्यावर ओवा घालायचा. त्यावर अंडी ठेवायची. त्यानंतर पुन्हा वालाच्या शेंगा ठेवायच्या. आता त्यावर मेरिनेट केलेले चिकन ठेवायचे. त्यावर पुन्हा वालाच्या शेंगा ठेवायच्या. त्यानंतर भांबुर्डीचा पाला घालून मडक्याचे तोंड गच्च बंद करायचे. मडक्यातून वाफ बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यायची. त्यासाठी मडक्याचे तोंड भांबुर्डीच्या पाला घालून घट्ट बंद केलेले आहे का याची खात्री करायची नाहीतर एकदा मडक्यातील अन्न शिजून झाल्यानंतर मडका उतरवला की पुन्हा मागे जाणे कठीण.

एवढे झाले की आता एक वीतभर खोल खड्डा खणायचा. त्यावर मडका उलटा करून ठेवायचा. मडक्याच्या गोलाकार सुकी लाकडे उभी करायची, त्यावर सुके गवत पसरायचे आणि पेटवायचे. लाकड पेटवल्या नंतर ती शिजेपर्यंत पाऊण तास (४५ मिनिटे) चा वेळ लागतो त्या दरम्यान गप्पा गोष्टींचा फड रंगतात. पाऊण तासानंतर मडक्यावर पाणी मारून पहायचे, तडकुन पाणी गायब झाल्यास समजायच की आता पोपटी खाण्यासाठी तयार झालेली आहे. त्यानंतर मडक्यावरील जाळ उसकून काढून मडका कोयता आणि गोणपटच्या सहाय्याने बाहेर काढायचा आणि आतील भांबुर्डीचा पाला कोयत्याच्या सहाय्याने बाहेर काढून अलगद मडका उलटा करून आतील जिन्नस बाहेर काढायचे. तर अश्या प्रकारे आता पोपटी खाण्यासाठी तयार झालेली आहे.

तेल आणि पाण्याचा वापर न करता बनवलेली पोपटी ही पचायला ही खूप हलकी असते. शाकाहारी माणसे सुद्धा चिकन / अंड्याशिवाय पोपटीचा आस्वाद घेऊ शकतात. जर भाज्या सोबत मटण / चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण / चिकन केळीच्या पानात गुंडाळून घेऊन दोऱ्याने बांधून मडक्यात ठेवायचे.

कोकणातील किनाऱ्यावरच्या भागातील कोळी बांधव “खाडीतली पोपटी” करतात. खाडीतून पकडलेल्या ताज्या खाऱ्या चिंबोऱ्या, मासे, आणि मोठ्या कोलंब्या या मडक्यात ठेवून पोपटी केली जाते.

वालाच्या शेंगा या “वातवर्धक” असल्याने ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी त्या खाण्याचा मोह आवरावा.
काळोखी रात्र, अंगाला झोंबणारी थंडी, पोपटीच्या शेकोटीत शेकत शेकत गरमा गरम वालाच्या शेंगावर ताव मारीत रात्रभर जागरण करीत गप्पा गोष्टींचा फड रंगवित निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीय असून याचा प्रत्येकाने एकदा तरी याची देही याची डोळा अनुभव घ्यावा.

चिकन कौल फ्राय

साहित्य / जिन्नस :– (६ जणासाठी)
मातीचा कौल, चिकन (१ किलो मध्यम आकाराचे), तेल, हळद, मीठ, आले लसूण पेस्ट, चिकन मसाला, गावठी तिखट मसाला, दही, सुकी लाकडे, चिमटा.

पाक कृती :-
चिकन कौल फ्राय करण्यासाठी किमान २ तासभर चिकनला हळद, मीठ, आले लसूण पेस्ट, चिकन मसाला, गावठी तिखट मसाला, दही लावून मेरिनेट करायला ठेवायचे. त्याच वेळी मातीचा कौल स्वच्छ धुवून घेऊन तो किमान एक तासभर पाण्यात भिजत ठेवायचा. नंतर चूल पेटवून त्यावर कौल ठेवायचा आणि त्यावर तेल सोडायचे. एकदा तेल गरम झाले की त्यात मेरीनेट केलेले चिकनचे तुकडे तळायला सोडायचे. थोड्या थोड्या वेळाने चिकनचे तुकडे व्यवस्थित तळण्यासाठी उलटे फिरवत राहायचे. १५ मिनिटांत चिकन लाल – काळपट झाल्यावर चिमट्याने बाहेर काढायचे. तर अश्या चिकन कौल फ्राय खाण्यासाठी तयार झालेली आहे.

लेखक – विशाल चंद्रकांत अडखळे.
दि. ०९/०३/२०२४


About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top