Shingroba Temple – वीर हुतात्मा शिंग्रोबा देऊळ


Shingroba Temple, Old Khandala Ghat, Khopoli

Table of Contents

 Shingroba Temple , Old Khandala Ghat, Khopoli  –  वीर हुतात्मा शिंग्रोबा देऊळ.
खंडाळा घाट, खोपोली.

"भूमीपुत्र आम्हीं या देशाचे,पण एक जागी स्थिरता नाही आम्हांला ! पोटाची खळगी भरण्यासाठी भ्रमंती सदैव, आज या गावी तर उद्या त्या गावी ! "

Shingroba Temple History


महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या ख॔डेरायाचे सोयरे तसेच दऱ्याखोऱ्यांत मेंढरे घेऊन फिरणारा आपला धनगर समाज पाहिल्यावर मला “दि अल्केमिस्ट” या पुस्तकाची आठवण होते.  जुन्या मुंबई पुणे  महामार्गावर आताचा ओळखला जाणारा खंडाळा घाट म्हणजेच इतिहासकालीन व्यापारी बोरघाट  आहे. याच मार्गावर घाटाच्या मध्यावर हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगराचे देऊळ आहे.  याच बोरघाटात ब्रिटिशांच्या काळात दऱ्याखोऱ्यां आणि निसर्गाच्या सान्निध्यात शिंग्रोबा नावाचा धनगर राहत होता. शिंग्रोबा पिढ्यानपिढ्या या घाटाच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर, डोंगर-कपारीत आपले मेढरं चरायला आणत असे. त्यामुळे त्याला येथील दऱ्याखोऱ्यांची, निसर्गाची, कड्याकपारींची आणि जमिनीच्या भुसभुशीतपणा – कठोरपणाची खडा न् खडा माहिती  होती.

इंग्रजांनी सन १८५३ साली मुंबई ते ठाणे रेल्वे  पुण्यापर्यंत आणायचा बेत आखला  होता. त्यासाठी इंग्रजांनी एका कमिटी स्थापना केली. ती कमिटी मार्ग कसा काढायचा याचा शोध घेत खंडाळ्याच्या घाटात आले. पण त्यांना काही ठोस उपाय सापडत नव्हता. ते रोज यायचे आणि इकडे तिकडे चाचपडत बसायचे.  तिथे वरती घाटात मेंढरांना चरायला घेऊन येणारा  शिंग्रोबा झाडाच्या आडोशाला बसून दररोज त्यांची मजा बघत बसायचा. शेवटी ते इंग्रज वैतागून काम अर्धवट सोडून जायच्या तयारीला लागले, तेव्हा  शिंग्रोबाने त्यांना विचारले “म्या तुमाला या भागात रोज बघतुया, काय करायचा बेत हाय तुमचा या डोंगरात?” त्यावर इंग्रज म्हणाले – ”आम्हाला मुंबई-ठाणे ही रेल्वे पुण्यापर्यंत घेऊन जायची आहे. त्यासाठी आम्ही रेल्वे रूळ बसवायला जागा शोधतोय, पण काही केल्या योग्य मार्ग सापडत नाही, म्हणून आता हे काम अर्धवट सोडून परत जाण्याचा विचार आहे आमचा” हे ऐकताच शिंग्रोबा म्हणाला  ”हात्तीच्या… Sss.. एवढंच हाय काय… या मी दाखिवतो रास्ता तुमाला… चला माझ्या मागनं…” यावर इंग्रजांना भलताच आश्चर्य आणि आनंद झाला. ते शिंग्रोबाच्या मागे चालू लागले आणि शिंग्रोबा मार्ग दाखवित पुढे चालू लागला. अशाप्रकारे शिंग्रोबाने इंग्रजांना घाटावर जायचा सोप्पा मार्ग दाखवला.

इंग्रज कमिटीला मार्ग सापडल्याचा आनंद  झाला, त्यांनी शिंग्रोबाला विचारले ”आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत. तुला काय पाहिजे असेल ते माग तुला ते देऊ” त्यावेळी विचार करून शिंग्रोबा म्हणाला ”मला बाकी काय देऊ नका तुमचं!! सायेब… आम्हाला फकत स्वातंत्र्य.. Sss द्या.”  हे ऐकताच इंग्रज चवताळले आणि त्यांनी बंदुकीतून गोळी घालून शिंग्रोबाचा घात केला. शिंग्रोबाने दिलेल्या माहितीच्या आधारे आणि वैज्ञानिक तपासणी करून, सह्याद्रीच्या काळाकभिन्न डोंगर फोडून रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आणि त्यावरून रेल्वेगाडय़ा धुराच्या नळकांड्या उडवित, हॉर्नचा भोंगा वाजवित डौलाने धावू लागल्या.

ज्या ठिकाणी इंग्रजांनी कपटाने शिंग्रोबाला मारले त्या जागेवर १९२९ साली मंदिर वजा स्मारक बांधण्यात आले. आणि पुढे धनगरांचा आधुनिक देवता म्हणुन शिंग्रोबा प्रसिध्द झाला. या मंदिराविषयी रितीरिवाज आणि गोष्टी प्रचलित आहेत. आजही देशावरून वरुन जेव्हा धनगर खाली कोकणात मेंढ्या घेऊन उतरात, तेव्हा शिंग्रोबाच्या मंदिरात ही लोकं मेंढीच्या पान्हातून थेट दुधाच्या धारेचा अभीषेक घालतात. मंदिरात तांदळा स्वरुपात शेंदुराने माखवलेला मोठा तांदळा आहे. आत त्रिशुल आणि धनगराची घुंगरू लावलेली काठी ठेवलेली आहे. जेव्हा नवीन मुंबई पुणे महामार्ग अस्तित्वात नव्हता तेव्हा खंडाळा घाट चढताना काही क्षणासाठी एसटी बसेस, बाकीच्या गाड्या तिथे थांबायच्या आणि प्रत्येकाची खिडकीतून बाहेर शिंग्रोबाला नाणे अर्पण करण्यासाठी धडपड असायची. आजही अनेक जण या घाटातून प्रवास करताना थोडा वेळ थांबुन शिंग्रोबाचे दर्शन घेऊनच पुढच्या प्रवासाला लागतात.

– विशाल अडखळे.


About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top